सातारा : ऊसाचा पहिला हप्ता ३८०० रुपये जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी जाहीर केला आहे. मात्र ३९०० अधिक १०० रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम असुन जोपर्यंत तो दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे. त्यामुळे संघटनांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आलेल्या ऊसदराच्या पत्राची संघटनांनी होळी केली. तर जरंडेश्वर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असुन अद्यापही त्यावर तोडगा निघाला नसल्याचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी सांगीतले.
ऊसाच्या पहिल्या हप्त्याच्या तिढा सोडवण्यासाठी कारखानदारांबरोबरचं जिल्हा प्रशासनानेही हालचाली सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स (चिमणगाव), अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (शेंद्रे), यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (रेठरे बुद्रुक), जयवंत शुगर्स (धावरवाडी), सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर), श्री. दत्त इंडिया (साखरवाडी) आणि शिवनेरी शुगर्स (जयपूर) या कारखान्यांनी तीन हजार ८०० रुपये पहिली उचल देण्याची भूमिका घेतल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाकडुन शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी यांना देण्यात आले. मात्र साखर कारखान्यांकडुन देण्यात येणारा हा पहिला हप्ता शेतकरी संघटनांना अमान्य आहे.
त्यामुळे आज सकाळी शहापुर फाटा येथे शेतकरी संघटनांच्यावतीने स्वाभिमानीचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, किसान कॉंग्रेसचे वसीम इनामदार व पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या पत्राची होळी करून जोपर्यंत कोल्हापुर पॅटर्नप्रमाणे दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला. शिवथर येथे संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय साबळे आणि रयत क्रांती संघटनेचे सोनू साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर नवारस्ता (ता. पाटण) येथे स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाच्यावतीने चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील यांच्यासह मोठा बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला होता.
दरम्यान कोल्हापुर प्रमाणे तीन हजार ९०० अधिक १०० रुपये असा दर जाहीर करावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांच्या नेतृत्वाखाली चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलसमोर आंदोलन सुरु केले आहे. कार्यकर्त्यांनी ऊसाची वाहतुक रोखुन धरली आहे. त्यामुळे कारखान्याचे सचिव संदीप सावंत यांनी आंदोलनस्थळी येऊन श्री. शेळके यांच्याशी चर्चा केली, मात्र रात्री उशीरापर्यंत त्यावर तोडगा निघालेला नसल्याचे श्री. शेळके यांनी सांगीतले.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होवुन महिना उलटत आला तरीही ऊसदराचा तिढा सुटलेला नाही. शेतकरी संघटनांकडुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे साखर काऱखान्यांच्या गाळप हंगामातही अडथळे निर्माण होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी तीन हजार ८०० रुपये ऊसदर जाहीर केला आहे. मात्र शेतकरी संघटनांना तो दर मान्य नसुन संघटना ३९०० अधिक १०० या सुत्रावर ठाम आहेत. त्यातुन तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.
कारखान्यांच्या गेटवर उद्यापासुन आंदोलन
कोल्हापूरप्रमाणे ऊस उचलीसाठी उद्या (सोमवारी) तीन कारखान्यांवर स्वाभिमानीचा काटा बंद आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये कृष्णा कारखाना व रयत कारखान्यावर देवानंद पाटील, बापूराव साळुंखे आणि रामभाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ऊस तोड, वाहतूक बेमुदत बंद व रस्ता रोको होईल. सह्याद्री कारखान्यावर येथे तालुका अध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, जयवंत शुगर्स येथे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, विक्रमसिंह कदम, यशवंत गोरे, संजय खंडाईत, संतोष ढाणे, अधिक शिंदे, दत्तात्रय येटणे सर, दत्तात्रय शेलार व पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन होणार आहे.
साताऱ्यात ऊसदराच्या पत्राची होळी; ३८०० दराविरोधात संघटना आक्रमक; शहापुर, शिवथर, नवारस्त्यावर आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पुन्हा बैठक
by Team Satara Today | published on : 15 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा