कोरेगाव : कोरेगाव तालुक्याच्या पुरवठा विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोमवारच्या धडाकेबाज कारवाईत तहसिलदार कार्यालय येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद कैलास शिंदे यांच्यासह खाजगी इसम अवधुत दिलीप कालेकर यांना १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तक्रारदार यांची कोरेगाव येथे भारत गॅस एजन्सी असून, गॅस वितरणाचे काम शासकीय नियमानुसार सुरू असताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे यांनी गोडाऊनची वारंवार तपासणी टाळण्यासाठी व एजन्सीविरोधातील तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख २५ हजारांवर आणण्यात आली. यापूर्वी तक्रारदारांनी भीतीपोटी २५ हजार रुपये दिल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणी तक्रारदारांनी १ एप्रिल रोजी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ६ एप्रिल रोजी कोरेगाव शहरात दोन ठिकाणी सापळा रचण्यात आला.
सापळा कारवाईदरम्यान आरोपी आनंद शिंदे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम अवधुत कालेकर याने कोरेगाव शहरातील जनसेवा सहकारी बँकेच्या शाखा कार्यालय परिसरात १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे कोरेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार गणेश ताटे, निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे व चालक महेश पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे तपास करत असून पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांचे पर्यवेक्षण आणि पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.