पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा जिल्ह्यात स्वागत

प्रजासत्ताक दिनासह जिल्हा नियोजन बैठकीसाठी आगमन

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला शंभर दिवसाचा रोड मॅप ठरवून दिला आहे. त्यानुसार सातारा जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील कॅबिनेट दर्जाचे चार मंत्री कामाच्या दृष्टीने सक्रिय झाले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार असून सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांचे साताऱ्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने राजकीयदृष्ट्या कंबर कसली आहे. पालकमंत्री पदावर ना. शंभूराज देसाई यांची वर्णी लागल्यामुळे शिंदे समर्थक तसेच शिवसैनिक हे अत्यंत जोशात आहेत. अशातच शुक्रवारी सायंकाळी ना. शंभूराज यांचे साताऱ्यात मुंबईवरून आगमन झाले. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, महिला संघटक शारदाताई जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. ना. शंभूराज देसाई यांनी हात उंचावत त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

पोवई नाका ते कोयना दौलत यादरम्यान त्यांच्या स्वागताचे शेकडो फलक उभारण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी शंभूराज देसाई यांच्या स्वागतासाठी त्यांच्या बंगल्यावर गर्दी केली होती. तसेच पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृती स्मारकाचे अनावरण कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुद्धा शेकडो सैनिकांनी गर्दी केली होती. हजारो तरुणाईच्या उपस्थितीत आणि संभाजी पाटील यांच्या सुयोग्य नियोजनाने हा सोहळा उत्साहात पार पडला.


मागील बातमी
ना. जयकुमार गोरे यांची शिखर शिंगणापूरमध्ये पेढेतुला
पुढील बातमी
न्यू महाबळेश्वर प्रकल्पाच्या उभारणीसाठी 12 हजार 809 कोटींचा खर्च

संबंधित बातम्या