सातारा : ज्ञानमुद्रा साहित्य समूहातर्फे राजमाता जिजाऊ काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनात वसुंधरा निकम यांच्या 'अक्षरपुष्प' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका डॉ.प्रा.नलिनी महाडिक आणि यशवंतराव निकम, माजी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या हस्ते शनिवार दि.८ मार्च रोजी झाले. याप्रसंगी मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, विश्वास नेरकर सचिव ग्रंथालय भारती महाराष्ट्र, डॉ.माणिक जाधव संस्थापक जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन सातारा, श्री रामदास जाधव यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक भवन कोडोली येथे झाले.
डॉ.प्रा. नलिनी महाडिक यांनी या कवयित्रेंकडून अजूनही सुंदर लेखन होईल त्यांनी लिहित रहावे साहित्य निर्मिती करावी, असे सांगत अक्षर पुष्प या काव्यसंग्रहाचे थोडक्यात विवेचन केले. पहिल्या सत्रामध्ये दिग्विजय जाधव, समृध्दी महाडिक यांनी अभिवाचन केले. सौ. वसुंधरा निकम यांनी राजमाता जिजाऊ यांच्यावर व्याख्यान दिले. दुपारच्या सत्रामध्ये राजमाता जिजाऊ काव्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रल्हाद पार्टी, प्रदीप कांबळे, कवी सरकार इंगळी, हेमा जाधव, राजेंद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे लेखक प्रदीप कांबळे यांनी अक्षर पुष्प या संग्रहातील आई ही कविता त्यांना भावली. या पुस्तकाचे आम्ही समीक्षण करू असे सांगत कवयित्री बद्दल गौरवोद्गार काढले. काव्य संमेलनामध्ये ४१ कवीकवयित्रींनी सहभाग घेतला. महिला दिनानिमित्त बहारदार कवितेचे सादरीकरण केले. चार उत्कृष्ट सादरीकरण कवयित्रींना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, गुलाब पुष्प तसेच इतर सर्व कवींना सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. या संमेलनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पाटण, कराड, लोणंद, खंडाळा इ. ठिकाणाहून साहित्यिक आले होते. सूत्रसंचालन कवीआनंद भारमल, वैष्णवी महाडिक तर आभार छाया नाळे यांनी मानले. प्रास्ताविक सारीका यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप निकम होते.