शेतकऱ्यांना ३३७ कोटींची मदत : ना. मकरंद पाटील

अवकाळी पाऊस व गारपिटीवर राज्य शासनाचा निर्णय

by Team Satara Today | published on : 30 July 2025


सातारा : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकर्‍यांच्या 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील 67 हजार 462 शेतकर्‍यांच्या 34 हजार 542.46 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी 59 कोटी 98 लाख 20 हजार, पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 463 शेतकर्‍यांच्या 45 हजार 128.88 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी 81 कोटी 27 लाख 27 हजार, नाशिक विभागातील 1 लाख 5 हजार 147 शेतकर्‍यांच्या 45 हजार 935.16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी 85 कोटी 67 लाख 8 हजार, कोकण विभागातील 13 हजार 608 शेतकर्‍यांच्या 4 हजार 473.69 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 9 कोटी 38 लाख 24 हजार, 

अमरावती विभागातील 54 हजार 729 शेतकर्‍यांच्या 36 हजार 189.86 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 66 कोटी 19 लाख 11 हजार आणि नागपूर विभागातील 50 हजार 194 शेतकर्‍यांच्या 20 हजार 783.16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी 34 कोटी 91 लाख 63 हजार रुपये मदतीचा समावेश आहे. याबाबत ना. मकरंद पाटील म्हणाले, राज्यातील अनेक जिल्ह्यांत फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येतील. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

- ना. मकरंद पाटील


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ठेकेदाराच्या आत्महत्येस सरकार जबाबदार : शशिकांत शिंदे
पुढील बातमी
जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न

संबंधित बातम्या