मेढा एस. टी. डेपोसाठी मिळाल्या नवीन ८ गाड्या

ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; लवकरच होणार लोकार्पण

सातारा : दुर्गम- डोंगराळ जावली तालुक्यात दळणवळण सुकर करण्यासाठी नेहमीच सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाच्या मेढा डेपोसाठी नवीन ८ एस.टी. बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसचे लवकरच लोकार्पण केले जाणार असून फेऱ्यांचा शुभारंभही केला जाणार आहे. 

मेढा डेपो तसेच सातारा डेपोतील अनेक बस गाड्या जुन्या- जीर्ण झाल्याने तसेच गाड्यांची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मेढा व सातारा डेपोला नवीन एस. टी. बसेस द्याव्यात अशी आग्रही मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याच्या परिवहन विभागाकडे केली होती. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार मेढा डेपोसाठी नवीन ८ गाड्या मंजूर झाल्या असून त्या आज मेढा डेपोत दाखल होणार आहेत. 

सद्य परिस्थितीत सातारा डेपोमध्ये १०७ गाड्या (इलेकट्रीक गाड्या धरून) आहेत तर, मेढा डेपोकडे ४३ गाड्या आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी सातारा डेपोला १३ तर मेढा डेपोला २४ नवीन गाड्या मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून पहिल्या टप्प्यात मेढा डेपोसाठी नवीन ८ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. मेढ्यासाठी आणखी १६ आणि सातारा डेपोसाठी १३ नवीन बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, नवीन आठ गाड्यांपैकी २ बसेस मेढा ते कुर्ला- नेहरूनगर, १ बस मेढा ते मुंबई, १ बस मेढा ते बार्शी, २ बसेस मेढा ते नाशिक तर उर्वरित २ बसेस मेढा ते परळी- वैजनाथ अशा धावणार आहेत. या नवीन बसेसमुळे जावली तालुक्यातील प्रवाशांना तसेच बाहेरून जावली तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असून नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

मागील बातमी
श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात 'महाशिवरात्री' निमित्त रुद्र अनुष्ठानाचे आयोजन
पुढील बातमी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कार प्रस्तावास मुदतवाढ

संबंधित बातम्या