मराठी भाषा जगण्याची आणि आधुनिकतेची जोड असलेली भाषा व्हावी : ‘अभिजात दर्जा नंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ परिचर्चेत उमटला सूर

by Team Satara Today | published on : 04 January 2026


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण इथे थांबून चालणार नाही. या भाषेला जगण्याची भाषा बनवली पाहिजे, यासाठी सर्वांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शासनाकडूनही योग्य नियोजनाची गरज आहे, असा सूर परिचर्चेतून समोर आला. 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ३)  ‘अभिजात दर्जा नंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यात श्याम जोशी, डॉ. संदीप क्षोत्री, डॉ. सुहास उगले, पी. विठ्ठल, श्रीधर लोणी, डॉ. चैती साळुंके, डॉ. अस्मिता हवालदार या भाषा तज्ज्ञांनी मते मांडली. 

श्रीधर लोणी  म्हणाले, मराठी भाषा काळानुरूप होण्यासाठी ती आधुनिक होणे आवश्यक आहे. आपल्याकडे मराठीची बाजारपेठ नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपण मराठी असल्याचा फक्त अभिमान बाळगतो पण मराठी अस्मिता आपल्या दररोजच्या आयुष्यात आढळत नाही, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठी पुस्तके, चित्रपटांचीही हीच अवस्था आहे.  आशयघन निर्मितीपासून बाजार पेठ निर्मितीपर्यंत सर्व स्तरावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. 

श्याम जोशी म्हणाले,  मराठी भाषेला राज्यमान्यता मिळाली पण समाज अजूनही गंभीर नाही.  प्रचलित शब्दांचा एकही कोश आज उपलब्ध नाही. आमचे मराठीवरचे प्रेम बेगडी आहे. आमच्या घरी आमची मुले कोणती भाषा बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही, असा खेद यांनी व्यक्त केला. 

पी. विठ्ठल म्हणाले,  अभिजित दर्जा मिळणे या घटनेकडे केवळ उत्सव म्हणून पाहिले जात आहे. सव्वा वर्ष उलटून सुद्धा भाषा विकासासाठी शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. केवळ अनुदान देऊन, पुस्तक छापणे या पलीकडे जाण्याची गरज आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याआधी तिला लोकभाषा बनवणे आवश्यक आहे.

अस्मिता हवालदार म्हणाल्या,  इंदूरमध्ये खूप मोठा मराठी समाज आहे. तिथे २०-२५  संस्था आहेत ज्या मराठीसाठी काम करत आहेत. पण या संस्थांना अजूनही महाराष्ट्रात प्रतिनिधित्व लाभलेले नाही. आमच्या संस्थांना गंभीरतेने घेतले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढली आहे. बोलायची भाषा आणि जगण्याची भाषा याचे अंतर आपल्याला अजूनही मिटवता आलेले नाही. मराठी ही बोलण्याची आणि जगण्याची भाषा झाली पाहिजे. ही सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी.  यासाठीचे काही उपक्रम राबविण्यात आले पाहिजेत. गणेश मंडळांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातच नव्हे तर गल्ली गल्लीतही हे उपक्रम राबविले पाहिजेत, असे मत डॉ. संदीप क्षोत्री यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले,  मराठीच्या विषयावर विचार मंथन होणे आवश्यक. मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी आपल्या सर्वांची इच्छाशक्ती आवश्यक आहे. सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

परिचर्चेत सहभागी मान्यवरांशी डॉ. महेश गायकवाड यांनी संवाद साधला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विचारभ्रष्टतेचे मूळ राजकीय, शैक्षणिक धोरणांतच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या वैचारिक उदासिनतेतही ; परिसंवादात खंत व्यक्त
पुढील बातमी
तोचतोचपणा टाळून स्वतःला पडताळून, तपासून पाहणे सजगपणाचे वाटते : अमोल पालेकर ; 'ऐवज' या पुस्तकावर ९९व्या साहित्य संमेलनात चर्चा

संबंधित बातम्या