चारित्र्याच्या संशयावरून कराडमध्ये महिलेचा निर्घृण खून; संशयित प्रियकर पोलिसांत हजर

by Team Satara Today | published on : 21 August 2026


कराड : येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरातील झोपडपट्टीत चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेचा तिच्या प्रियकरानेच हात आणि पायाने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संशयित सागर महादेव माने (वय ३२, रा. जुने मालखेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला गेल्या दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त होऊन आपल्या मुलासह कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमजवळील झोपडपट्टीत राहत होती. ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होती. दरम्यान, वर्षभरापूर्वी तिची ओळख जुने मालखेड येथील सागर माने याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सागर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, ज्यातून त्यांच्यात वारंवार वाद आणि शारीरिक-मानसिक छळाचे प्रकार घडत होते.

गुरुवारी रात्री याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. मध्यरात्री पीडित महिलेचा मुलगा घरी नसल्याची खात्री करून सागर मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिच्या घरात शिरला. त्यावेळी महिला गाढ झोपेत असताना त्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला. त्याने दोन्ही हातांनी आणि नंतर पायाने गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर मारहाणीमुळे ती जागीच बेशुद्ध पडली. यानंतर सागरने थेट पोलीस ठाणे गाठून आपण खून केल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेतील महिलेला तातडीने कृष्णा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी संशयित सागर माने याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरातील अतिक्रमण हटले; आता रिक्षा थांब्यांना शिस्त लावा - सामाजिक कार्यकर्ते निलेश आपटे आणि अमर बेंद्रे यांची मागणी
पुढील बातमी
सातारा पालिकेचे सील तोडून गाळा वापरल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या