फलटण : छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील स्टेटसवरून उद्भवलेल्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील तहसीलदार कार्यालयात शांतता कमिटी सदस्य, विद्यमान नगरसेवक आणि पत्रकारांची संयुक्त बैठक गुरुवारी (दि. १५) सायंकाळी पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि तहसीलदार अभिजीत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
बैठकीची सुरुवात नायब तहसीलदार सोनवणे यांनी प्रास्ताविकाने केली. या प्रसंगी फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, नगरपालिकेचे सर्व विद्यमान नगरसेवक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना नगरसेवक अशोक जाधव यांनी फलटण शहराला हिंदू-मुस्लिम एकोप्याची मोठी परंपरा असल्याचे सांगत, भविष्यातही शहरात शांतता व सामाजिक ऐक्य कायम राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. समाजसेवक वसीम मनेर यांनी घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला, तर नगरसेवक रोहित नागटिळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून इतर संशयित आरोपी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, सामाजिक कार्यकर्ते निलेश तेलखडे यांनी शहरात व्यापक स्वरूपात शांतता कमिटीची मोठी बैठक घेण्याची सूचना प्रशासनासमोर मांडली.
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, फलटण शहरात नेहमीच मोठे सामाजिक ऐक्य राहिले आहे. संबंधित घटनेत सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या घटनेशी संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आणि समाजातील भावना दुखावल्या गेल्याने, पुढील कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण होऊ नये आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
अध्यक्षीय भाषणात तहसीलदार अभिजीत जाधव यांनी फलटण शहर हे हिंदू-मुस्लिम एकता, सामाजिक सलोखा आणि सहकार्याबाबत नेहमीच आदर्श राहिले असून, ही परंपरा सर्वांनी मिळून पुढे चालवावी असे सांगितले. बैठकीच्या शेवटी नायब तहसीलदार सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.