सिद्धनाथ-जोगेश्वरी हळदी समारंभ उत्साहात; दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार

by Team Satara Today | published on : 12 November 2026



म्हसवड : लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कार्तिक शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु. प्रतिपदा या तब्बल एक महिना चालणार्‍या शाही मंगल विवाह सोहळयाचा प्रारंभ दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता घटस्थापनेने करण्यात आला. त्याच दिवशी दुपारी 11 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूंच्या उत्सवमूर्तिंना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ, मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आता तुलसी विवाहादिवशी म्हणजे शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. मंगळवार दि. 10 नोव्हेंंबर रोजी दिवाळी पाडव्यादिवशी सकाळी 11 वाजता मंदिरातील हत्ती मंडपात एका छोटेखानी दिवानावर श्रींच्या पंचधातूंच्या उत्सवमूर्ती स्थानापन्न करण्यात आल्या. परंपरागत प्रथेनुसार सालकरीणबाई सौ. सुरेखा गुरव ( बहिरट ) यांच्या हस्ते सर्वप्रथम श्रींना हळदी लावण्यात आल्या त्यानंतर गुरव समाजातील, शहरातील व परगावहून आलेल्या हजारो महिलांनी श्रींना हळदी लावल्या. दरम्यान, भाऊबिजेच्या संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचारती, धुपारती घेऊन सालकरी सोमनाथ गुरव (बहिरट), पुजारी मंडळी, ढाल, तलवार, श्रीनाथ मठातील रवीनाथ महाराज, राजदंडधारी पुरोहित, ढोल वाजवणारे घडशी, डवर वाजवणारे डवरी तसेच श्रींचे सेवेकरी, मानकरी आदींच्या लवाजम्यासह मिरवणूक निघाली. आपल्या घरासमोर श्रींची आरती मिरवणूक जास्तीत जास्त वेळ थांबावी म्हणून पारंपारिक प्रथेनुसार प्रत्येक घरातील सुवासिनींनी आरती घेतलेल्या सालकर्‍यांना औक्षण करून ओवाळले. शनिवारी दि. 21 नोव्हेंबर रोजी (तुलसी विवाह) पहाटे साडेपाच वाजता घट उठविले जाणार असून,नवरात्र समाप्ती होणार असून बारा दिवसाचे उपवास सोडले जाणार आहेत. त्याच रात्री 12 वाजता श्रींचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. विवाहानंतरची वरात म्हणजेच येथील रथयात्रा होय. ही रथयात्रा मार्गशीर्ष शु.1 प्रतिपदा रोजी असते चालू वर्षी रथयात्रा बुधवार दि. 9 डिसेंबर रोजी आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात प्रसिद्ध असलेल्या म्हसवडच्या अनोख्या दिवाळी मैदानाने’ यंदाही भाविक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त निघालेली श्रींची आरती मिरवणूक तब्बल 27 तास चालली. फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भाविकांचा प्रचंड उत्साह अशा वातावरणात या अनोख्या परंपरेचा थाट अनुभवायला मिळाला.
आदल्या दिवशी दुपारी 3 वाजता सिद्धनाथ चौकातून निघालेली श्रींची आरती मिरवणूक दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मंदिरात पोहोचली. तब्बल 27 तास चाललेल्या या मिरवणुकीने म्हसवडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे अनोखे दर्शन घडविले. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दूरदूरच्या गावांतून नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
घरासमोर आरती थांबविण्यासाठी फटाक्यांची चढाओढ!
म्हसवडच्या दिवाळी मैदानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे श्रींची आरती मिरवणूक आपल्या घरासमोरून जाताना अधिकाधिक वेळ थांबावी, यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह. प्रत्येक घरासमोर सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. घरातील सुवासिनींनी आरती घेऊन आलेल्या सालकर्‍यांचे औक्षण करून श्रींची आरती ओवाळली. कुटुंबातील सर्वांनी श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
आपल्या घरासमोर श्रींची आरती अधिक वेळ थांबावी, यासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्याची जणू स्पर्धाच रंगली होती. आकाशात उंच झेपावणारे फटाके, रंगीबेरंगी रोषणाई आणि फटाक्यांच्या कडकडाटाने संपूर्ण म्हसवड नगरी उजळून निघाली होती. ढोल-ताशा, सनई-चौघड्यांच्या मंगलमय निनादात आणि श्रींच्या जयघोषात दिवाळी मैदानाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. नकाशेपहा
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने रंगणारे म्हसवडचे दिवाळी मैदान हे केवळ फटाक्यांची आतषबाजी नसून श्रद्धा, परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. घराघरांतून श्रींचे स्वागत करण्याची आणि आरती मिरवणुकीत सहभागी होण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. त्यामुळेच म्हसवडचे दिवाळी मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून नागरिक आवर्जून येतात.
तब्बल 27 तास चालणार्‍या या मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी मिरवणुकीसोबत अग्निशमन वाहन आणि कर्मचार्‍यांची तैनाती केली होती. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रशासन आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुढील बातमी
सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा; भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा

संबंधित बातम्या