सातारा, दि. ९ : जागतिक वारसा स्थळ कास पठाराचा हंगाम सुरू झाला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे कासला तीन दिवसांत हजारो पर्यटकांनी भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला.
फुलांच्या अलौकिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावरील हंगाम सुरू झाला आहे. पावसाची उघडझाप होत आहे. पठारावर ऊन, अधून मधून हलकासा पाऊस, कधी कधी धुके आहे. थंडगार वाऱ्याची झुळूकही येत आहे पावसाळी वातावरण झाल्यास ढगही पठारावर उतरत आहेत. त्यामुळे डोंगर उतारावर आकर्षक नजारा पर्यटक अनुभवत आहेत. पठार वेगवेगळ्या फुलांनी बहरू लागलं आहे. पहिल्या टप्प्यात काही दुर्मीळ फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कासचा अधिकृत हंगाम वनविभाग व कास कार्यकारी समितीच्यावतीने चार सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला. यावेळी ऑनलाइन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. मात्र, आरक्षण न करता आलेल्या पर्यटकांची संख्याही मोठी होती.
कास कार्यकारी समितीच्यावतीने पर्यटकांच्या सोयीसाठी १३२ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना इतर सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. पठारावर दुर्मीळ रंगीबेरंगी फुलांचे दर्शन होऊ लागले आहे. सध्या टूथब्रश, दीपकांडी, आभाळी, सोनकी, तेरडा या फुलांना तुरळक स्वरूपात भर आला आहे. पर्यटक मोठ्या संख्येने कासला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. काही परिसर पिवळ्या, लाल फुलांनी बहरला आहे. पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. लाल-गुलाबी तेरडा, गेंद, सीतेची आसवे, चवर फुले आहेत. कुमुदिनी तलावही फुलांनी बहरला आहे. उर्वरित इतर फुले भरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांनी कास पठाराला येत असताना www.kas.ind.in या वेबसाईटला ऑनलाइन बुकिंग करून येण्याचे आवाहन वन विभागाने व कास पठार कार्यकारी समितीने केले आहे.