महापुरुषांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांविरोधात कठोर कायदा हवा

खासदार उदयनराजे भोसले यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 27 March 2025


सातारा : छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य, टिपणी अथवा कृती करणार्‍या अपप्रवृत्तींना चाप लावणारा मकोका किंवा टाडासारखा कठोर कायदा हवा. त्यामध्ये अजामीनपात्र आणि दहा वर्ष सश्रम करावासाची शिक्षा असावी, अशा रोखठोक मागणीचे निवेदन खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे घेतली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. या निवेदनात नमूद आहे की, राज्य शासन व केंद्र शासनाने वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या प्रवृत्तींना धडकी भरेल अशा कायद्याची रचना करावी. या कायद्यामध्ये दहा वर्ष सश्रम कारावास व आर्थिक दंडाची तरतूद असावी. तो कायदा जर आपण केला नाही तर छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. राज्य शासनाने तज्ञांशी विचारविमर्श करून ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून यापूर्वीच छत्रपती शिवरायांचा व मराठा साम्राज्याचा शासनमान्य इतिहास प्रसिद्ध करणे गरजेचे होते. काही अपप्रवृत्तींमुळे समाजात दुही पसरते व देशातील कायदा सुव्यवस्था देखील बिघडते. शेजार्‍यांची मने कलुषित होतात. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य, केंद्र शासनाने महापुरुषांच्या अस्मितेचे संरक्षण करणारा कठोर कायदा करावा. तसेच ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी यांच्या चित्रीकरणापूर्वी सेन्सर बोर्डाला सहाय्यभूत असलेली इतिहास तज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी. या कमिटीच्या शिफारशी विचारात घेऊन सेन्सॉरशिप देण्यात यावी. छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारणे गरजेचे आहे. या स्मारकामध्ये राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरून संशोधन व संकलित केलेले छत्रपतींविषयीचे अप्रकाशित दस्तऐवज, चित्रे, शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक नोंदी, युद्धनीतीचे पुरावे यांचा यामध्ये समावेश असावा. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात होदेगिरी येथे आहे. आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने हे क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने भरीव निधी देऊन या परिसराचा विकास करावा.

स्वराज्याच्या राजगड, रायगड, जिंजी व अजिंक्यतारा अशा चार राजधानी आहेत. या राजधान्यांचा आणि परिसराचा विकास करून दुसर्‍या टप्प्यात पानिपत, आग्रा, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर अशा ठिकाणच्या विकासाची धोरणे आखावित. छत्रपती शिवरायांचे मुंबई येथील अरबी समुद्रातील भव्यस्मारक उभारण्याची पायाभरणी झाली आहे. मात्र या विषयाला अद्याप गती मिळालेली नाही. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी काका धुमाळ, एडवोकेट विनीत पाटील, कुलदीप अण्णा शिरसागर, करण यादव उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोहम्मद युनूस चीनमध्ये जाताच अमेरिकन आर्मीचे जनरल बांगलादेशमध्ये
पुढील बातमी
राहत्या घरातून युवक बेपत्ता

संबंधित बातम्या