साताऱ्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या: वाढे फाटा येथील मुलींच्या वसतिगृहात घेतला गळफास

by Team Satara Today | published on : 22 October 2026


सातारा : शहराजवळील महामार्गावरील वाढे फाटा येथील एका महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. पूजा माने (वय 19, रा. मानेवाडी, ता. खटाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11 वाजल्यानंतर पूजा तिच्या खोलीत एकटी होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले. बराच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याने तिला संशय आला. तिने तातडीने याबाबत वसतिगृहाच्या रेक्टर यांना माहिती दिली. त्यानंतर रेक्टर यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकारामुळे वसतिगृहात खळबळ उडाली. घटनेची माहिती महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांकडून पंचनामा; मोबाईल ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पूजाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालासह तपासातील अन्य बाबींच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट
पूजा नैराश्यात असल्याचे तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिला नेमका कोणता त्रास होता किंवा तिने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांकडून तिच्या मोबाईलमधील माहिती आणि अन्य उपलब्ध बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा

संबंधित बातम्या