सातारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोमवारी सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही या प्रकारासाठी जबाबदार धरण्यात आले.
या आंदोलनामध्ये सातारा शहर संघटक प्रणव सावंत, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, उपजिल्हा संघटक सादिक बागवान, राहुल जाधव, श्रीकांत पवार, सुनील पवार, आकाश पवार, सुनील भोसले हे सहभागी झाले होते.
शिवसैनिकांनी येथील राधिका रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या कारभाराचा निषेध केला. आवाज कोणाचा शिवसेनेचा, पाचशेत विकले जाल तर असेच रस्ते पहाल, अशा उपरोधिक घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
या आंदोलनाबाबत बोलताना शहर संघटक प्रणव सावंत म्हणाले, सातारा पालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. जे रस्ते ठेकेदारांना कराराने दिलेले आहेत, त्या ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या संदर्भात भूमिका घेताना दिसत नाही. पावसाची तांत्रिक अडचण वगळली तरी यापूर्वीच रस्ते दर्जेदार असते तर हा प्रकार उद्भवलाच नसता. या संदर्भात पालिकेने योग्य वेळी आणि योग्य भूमिका घेतली नाही तर शिवसैनिक याहीपेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला.