मुंबई : "खरातकडे असलेल्या माहितीमुळे अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी खरातचा काटा काढला जाऊ शकतो. अशोक खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ तारखेला त्याला न्यायालयात हजर करताना त्याचे एन्काउंटर घडवून आणले जाऊ शकते, असा दावा देसाई यांनी केला आहे. राजकीय नेत्यांची नावे समोर येऊ नयेत यासाठी हे संपूर्ण प्रकरण कायमचे बंद करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वर्तवली आहे.
अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या पापाचा घडा भरला आहे. एका पीडित महिलेने धाडस दाखवत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले असून, एका पेनड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे.
संपूर्ण प्रकरण कायमचे बंद करण्याचा कट
तृप्ती देसाई यांनी खरातचे अनेक बड्या मंत्र्यांशी आणि राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या की, "खरातकडे असलेल्या माहितीमुळे अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी खरातचा काटा काढला जाऊ शकतो. अशोक खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ तारखेला त्याला न्यायालयात हजर करताना त्याचे एन्काउंटर घडवून आणले जाऊ शकते, असा दावा देसाई यांनी केला आहे. राजकीय नेत्यांची नावे समोर येऊ नयेत यासाठी हे संपूर्ण प्रकरण कायमचे बंद करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत खरातच्या ताब्यातून जो पेनड्राइव्ह जप्त केला आहे, त्यातील व्हिडिओ पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. अनेक महिलांचे शोषण करून त्यांचे चित्रीकरण केल्याचा संशय बळावला आहे. या कृत्यामुळे आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खरातच्या संपर्कात कोणकोणते व्हिआयपी लोक होते, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.