सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी वसुलीचा धडाका सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षात थकलेल्या देयकांसाठी थकबाकीदारकांचे गाळे अथवा घरकुले सील करण्याचा सपाटा लावल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेने एक जानेवारी ते 31 जानेवारी यादरम्यान तब्बल 5 कोटी 44 लाख 36 हजार एकशे वीस रुपयाची विक्रमी वसुली केली आहे. ही वसुली 83 टक्क्याने झाल्याचे कर अधिकार्यांनी सांगितले आहे.
यंदाच्या वसुलीचे वैशिष्ट्य म्हणजे वॉरंट ऑफिसर, कर अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या बैठका होऊन त्या पद्धतीने वसुलीचे नियोजन करण्यात आले. वसुली प्रमुख उमेश महादर यांनी कर अधिकारी म्हणून अधिभार स्वीकारल्यापासून सातारा शहरात पालिकेची तीन पथके स्वतंत्रपणे तैनात आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल 21 गाळे सील करण्यात आले आहेत. तसेच घरपट्टी थकीत करणार्यांना वॉरंट बजावल्याने पालिकेच्या तिजोरीत डिसेंबरमध्ये दोन कोटी 14 लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. तोच कित्ता पालिकेने जानेवारी महिन्यात चालू ठेवला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच महिन्यामध्ये 5 कोटी 44 लाख 36 हजार 120 रुपयांचा महसूल गोळा करत वसुली विभागाने थकबाकीदारकांना इशारा दिला आहे. यामध्ये एक जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत एक कोटी 88 लाख 88 हजार, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान 3 कोटी 55 लाख 47 हजार रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. गेल्या तीन वर्षाचा आढावा घेता यंदाची वसुली मागील दोन वर्षापेक्षा 28 टटक्क्यांनी अधिक आहे.
सातारा पालिकेला यंदा 48 कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट आहे. पालिकेने तब्बल 24 कोटी रुपयांची वसुली गेल्या तीन महिन्यात केली आहे. थकबाकीदारांनी सुद्धा या कारवाईचा धसका घेऊन तातडीने महसूल देयके जमा करायला सुरुवात केली आहे. सातारा पालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक यावेळी 15 फेब्रुवारी नंतर मांडले जाईल. शहराच्या हद्दीमध्ये तब्बल 36 हजार सदनिका असून त्यातील सर्वात जुन्या थकबाकीदारकांचे प्रमाण हे सहा टक्के इतके आहे. त्याच थकबाकी वर लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध वसुलीचा अजेंडा कायम ठेवण्यात आल्याने पालिकेच्या महसुलामध्ये तातडीने भर पडत आहे. थकबाकी धारकांनी कारवाईचे कटू प्रसंग टाळण्यासाठी आपली प्रलंबित देयके तातडीने भरावीत आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.