मामाच्या गावाला जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघींचा जागीच मृत्यू, लहान भाऊ गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 08 June 2026


फलटण :  मामाच्या गावाला जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाने भीषण घाला घातला आहे. नीरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरूम गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 

​या अपघाताबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे तिघे जण बारामती तालुक्यातील मुर्टी येथील आपल्या मामाच्या गावाला जाण्यासाठी स्कुटीवरून निघाले होते. त्यांची स्कुटी नीरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाट्याजवळ आली असता, समोरून येणाऱ्या एका टेम्पोची (क्र. डीडी ०१ जी ९३४३) आणि स्कुटीची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की स्कुटीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतरापर्यंत फरफटत नेल्यामुळे या दुर्घटनेची तीव्रता आणखीनच वाढली.

​या भीषण अपघातामध्ये सेजल आणि अक्षरा या दोन्ही सख्ख्या बहिणींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा लहान भाऊ पवन हा गंभीर जखमी झाला. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि गंभीर जखमी पवनला उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने रात्री उशिरा त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली, तसेच संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

​या दुर्दैवी अपघातामुळे मुरूम येथील बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत सेजल ही बारावीत शिकत होती, तर अक्षरा नुकतीच दहावीत गेली होती. दोघीही अभ्यासात अतिशय हुशार आणि सर्वांच्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. भविष्यात एअर होस्टेस होण्याची त्यांची स्वप्ने होती, मात्र नियतीने घातलेल्या या एकाच घातामुळे त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या. तर जखमी पवन हा यंदा सहावीत गेला आहे. रविवारी दुपारी बारामती शासकीय रुग्णालयातून दोन्ही बहिणींचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर मुरूम येथे आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित आई नीलम बोडरे व नातेवाईकांचा आक्रोश काळजाला भिडणारा होता. साखरवाडी विद्यालयातील शिक्षक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मृत भगिनींना साश्रू नयनांनी निरोप दिला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा इशारा

संबंधित बातम्या