राज्यात सद्यस्थितीत ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर "मिशन मुरघास" ही जनजागृती व कृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी दिली आहे.
दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर व पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होतो. यावर उपाय म्हणून, सन २०२६-२७ मध्ये खरीप हंगामात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी ४८.२० कोटी आणि विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातंर्गत ३ कोटी, असा एकूण ५१.२० कोटी निधी आधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच, सध्याच्या टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून ६६.४१ कोटी व विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत १० कोटी, असा एकूण ७६.४१ कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रावर चारा लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये व अंमलबजावणी
•पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम), SMART (स्मार्ट) योजनेअंतर्गत मुरघास उत्पादक व विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने चाऱ्याची कापणी, कुट्टी, दाबणी व हवाबंद साठवणुकीचे प्रशिक्षण दिले जाईल.
•दूध सहकारी संघ, सहकारी दूध संकलन संस्था, महिला बचत गट, ग्राम संघ, शेतकरी उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्र व ग्रामस्तरीय यंत्रणेच्या सहभागातून गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित करून मुरघासाचे महत्त्व पटवून दिले जाईल.
•मका, ज्वारी, नेपिअर यांसारख्या कमी कालावधीत व कमी पाण्यात जादा उत्पादन देणाऱ्या चारा पिकांपासून मुरघास तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्र. २ अंतर्गत १९ जिल्ह्यांसाठी विशेष 'मुरघास योजना '
विदर्भ व मराठवाडा विभागातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांसाठी उन्हाळ्यातील व दुष्काळी परिस्थितीतील वैरण टंचाईवर मात करण्यासाठी 'मागेल त्याला मुरघास' ही विशेष योजना राबवली जात आहे.
•या योजनेअंतर्गत पात्र पशुपालकांना प्रति जनावर प्रतिदिन ५ किलो मुरघास ३ महिन्यांच्या (९० दिवस) कालावधीसाठी देय असून, त्यासाठी प्रती किलो ३ रुपये दराने अनुदान देय आहे.
•या १९ जिल्ह्यांमधील सर्व पात्र दुग्ध उत्पादक शेतकरी व पशुपालक यासाठी अर्ज करू शकतात. लाभाथ्यांनी मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाईल.
•इच्छुक शेतकरी https://vmddp.com/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
प्रत्येक जिल्ह्याने वैरण बियाणे वाटप, चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करावा आणि या मोहिमेस क्षेत्रीय स्तरावर प्राधान्य देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
"राज्यात घोषित झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुधनाला चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने 'मिशन मुरघास' ही मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. शासनाकडून वैरण बियाणे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त निधीचा पुरेपूर वापर करून, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासात रूपांतर करा; जेणेकरून भविष्यातील टंचाईच्या काळात जनावरांचे पोषण व दूध उत्पादन सुरळीत राहील. विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'मागेल त्याला मुरघास' या विशेष योजनेचा जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. सशक्त पशुधन व समृद्ध शेतकरी हेच आपले ध्येय आहे."
राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा