‘एल निनो’च्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी सातारा जि.प.चे ’सातारा जलसमृद्धी अभियान’; अभियानाचा खंडाळा तालुक्यातील ग्रामपंचायत खेड बुद्रुक येथे शुभारंभ

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : जागतिक हवामान बदलामुळे ‘एल निनो’चा प्रभाव पडण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे किंवा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दुष्काळ व पाणीटंचाई प्रतिबंधासाठी विशेष कृती आराखडा (वॉर प्लॅन) लागू केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 ते 15 जुलै या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ’सातारा जलसमृद्धी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ करणे, भविष्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे हा आहे.

या अभियानांतर्गत विकसित भारत-जीरामजी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग तसेच पाणी व स्वच्छता विभागामार्फत विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जाणार आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाऐवजी लागू करण्यात आलेल्या विकसित भारत- रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, 2025 अंतर्गतही ही कामे राबविण्यात येणार आहेत. अभियानामध्ये जलतारा (शेतातील शोषखड्डे), वर्षाजल संधारण, शोषखड्डे, सीसीटी अनघड दगडी बांध, नाल्यांमधील गाळ काढणे, नाला खोलीकरण, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध आदी जलसंधारणाची विविध कामे करण्यात येणार आहेत.

विशेषत: पावसाचे जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या उद्देशाने जलतारा (शेतातील शोषखड्डे) या उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी एकूण 30 हजार जलतारा कामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत विविध निधींतर्गत नवीन व दुरुस्तीची कामेही सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण हौद, पाझर तलाव दुरुस्ती, साठवण व वळण बंधार्‍यांची दुरुस्ती तसेच मागणीनुसार ’गाळमुक्त धरण झ्र गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नवीन कामांचाही समावेश असेल.

या अभियानाचा शुभारंभ खंडाळा तालुक्यातील ग्रामपंचायत खेड बुद्रुक येथे जलतारा कामाच्या भूमिपूजनाने करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती सौ. लता कर्णे, जिल्हा परिषद सदस्य संतोष साळुंखे तसेच खंडाळा पंचायत समितीच्या सभापती सौ. छाया जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या अभियानात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच शाळा आणि महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलजागृती करावी आणि जलसंधारणाची कामे लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे. ’पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सातारा जिल्हा परिषद भविष्यातील जलसुरक्षेसाठी लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापनाचा मजबूत पाया रचण्याच्या दिशेने हे अभियान प्रभावीपणे राबविणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पॅरोलवरून पसार झालेला खुनातील आरोपी चार वर्षांनी सातारा पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुढील बातमी
हद्दवाढीतील सात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे नगरपरिषदेत समावेशन; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते आदेशांचे वितरण

संबंधित बातम्या