अजित पवार अपघाताच्या सत्यशोधनासाठी रोहित पवारांच्या लढ्याला बळ; पद्मश्री लक्ष्मण माने मैदानात

भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचा आंदोलनात उतरण्याचा निर्णय; चौकशीतील पारदर्शकतेसाठी सरकारला सवाल

by Team Satara Today | published on : 20 November 2026


सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलून या दुर्घटनेमागील वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता सामाजिक संघटनांचेही पाठबळ मिळू लागले आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उभारलेल्या लढ्याला भटक्या-विमुक्त जमाती संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे हजारो कार्यकर्ते आगामी आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत माने यांनी ही भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव आणि जिल्हाध्यक्ष दिलीपकुमार जाधव उपस्थित होते.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. या दुर्घटनेतील प्रत्येक बाबीची सखोल तपासणी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे. चौकशीच्या प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माने यांनी केली.
या प्रकरणात महाराष्ट्रात गुन्हा दाखल करून घेण्याबाबत टाळाटाळ झाल्याचा आरोप होत असून, अखेर कर्नाटकात एफआयआर दाखल करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. सरकारने स्वतःहून या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, रोहित पवार यांना वारंवार पत्रकार परिषदा घेऊन आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारून न्यायाची मागणी करावी लागत आहे, याकडे माने यांनी लक्ष वेधले.
राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वातील एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या अपघाती निधनाची चौकशी पारदर्शकपणे होऊ शकत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या न्यायाच्या अपेक्षांचे काय, असा सवाल माने यांनी उपस्थित केला. या लढ्याला केवळ राजकीय आंदोलन म्हणून न पाहता सत्यशोधनाची लोकशाही लढाई म्हणून पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करताना माने यांनी शरद पवार यांनी एनडीए सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेचे संरक्षण करण्यासाठी समविचारी शक्तींनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भटक्या-विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीला न्याय्य दिशा मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वातंत्र्यलढ्यातील साताऱ्याच्या क्रांतीचा इतिहास रुपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपट प्रदर्शित
पुढील बातमी
साताऱ्याच्या विकासासाठी शिवेंद्रसिंहराजेंची मोठी कामगिरी! आठ दिवसांत २०९.९१ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

संबंधित बातम्या