भुईंज : देशातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो ऊर्जादाताही आहे आणि आता त्याने इंधनदाता होणे अत्यंत आवश्यक आहे. 'नॉलेज इज पॉवर' (ज्ञान हीच शक्ती) या उक्तीप्रमाणे २००४ सालापासून देशात अन्न उत्पादनासोबतच इथेनॉल निर्मितीद्वारे शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.
स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मंत्री गडकरी आले होते, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वीर हे राष्ट्रभक्त आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी तळमळणारे नेतृत्व होते. त्यांच्यासारख्या सैनिकांच्या त्यागामुळे आणि परिश्रमाने इतिहास लिहिला गेला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सहकारी चळवळीचे मोठे योगदान आहे. समाजभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व नसेल तर सहकारी कारखाने संपुष्टात येतात. पश्चिम महाराष्ट्रात अनंतराव गाडगीळ, विखे-पाटील यांनी सहकार चळवळ रुजवली, मात्र तेवढे यश विदर्भात मिळाले नाही. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाना यशस्वीपणे चालवणे हे गुणवत्तेचे लक्षण आहे, तर विदर्भातील सहकाराची स्थिती काहीशी कठीण आहे. मी स्वतः चार कारखाने चालवतो, परंतु तेथे सिंचनाचा अभाव होऊ दिला नाही. शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार करून मी सातत्याने प्रयत्न करत आहे.
सध्या साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन मूल्य प्रति किलो २५ ते २६ रुपये आहे, तर भारतात हेच मूल्य ३२ ते ३३ रुपये आहे. त्यामुळे साखरेतून थेट नफा मिळवणे कठीण झाले आहे. कापूस स्वस्त आणि कापड महाग, तसेच गहू स्वस्त आणि ब्रेड महाग अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी विविध पूरक उपाययोजना राबवल्या पाहिजेत. सध्या जागतिक स्तरावर इथेनॉलची मागणी वेगाने वाढत आहे. वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर सुरू झाला असून देशात दोन हजार कोटी लीटर उत्पादन क्षमता आहे. टोयोटा कंपनीने १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने तयार केली असून भविष्यात अशा गाड्या मोठ्या प्रमाणावर धावतील. कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. याशिवाय, रस्ते मजबूत करण्यासाठी डांबरामध्ये प्लास्टिक, कचरा आणि टायरच्या तुकड्यांचा वापर केला जात असून भविष्यात हायड्रोजन इंधनाचा वापरही वाढणार आहे.
भविष्यात उत्तम रस्ते तयार करून लोकांचा त्रास कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे सरकारी कर्मचारी आपल्या पगारातून बचत करून सेवानिवृत्तीनंतर व्याज मिळवतो, त्याचप्रमाणे आपण पाण्याचा साठा केला पाहिजे, कारण पाणी हेच भविष्य आहे. तलावातील गाळ काढून तो रस्त्यांच्या कामात वापरल्यास रस्ते अधिक मजबूत होतात. पुणे-सातारा रस्त्याच्या कामातील विलंबाबाबत गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि संबंधित कंत्राटदाराच्या संथ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दर्जेदार काम न करणाऱ्या अशा ठेकेदारांना आपण काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.