सातारा : अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेने गेल्या तेरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश आले आहे. सातारा नगरपालिकेतील 13 कर्मचार्यांना सफाई कामगार म्हणून नियुुक्ती देण्यात आली असून, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज ऊर्फ बबलू सोलंकी आणि उपाध्यक्ष मनोज बिवाल यांनी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याची साथ मिळाली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून 13 कर्मचार्यांच्या नियुुक्तीचा मार्ग मोकळा झाला.
नगराध्यक्ष अमोल मोहिते व आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या उपस्थितीत संबंधित कर्मचार्यांना नियुुक्तीपत्रे देण्यात आली. 24 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार (जीआर) या नियुक्त्या करण्यात आल्या असून 2016 नंतर 2026 ला एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती झाली असल्याची माहिती यावेळी बबलू सोलंकी यांनी दिली.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या नियुुक्तीची प्रतीक्षा करणार्या कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेरा वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या यशामुळे संघटनेच्या पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.
या नियुुक्तीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष प्रताप बनकर, अविनाश कदम, बाळासाहेब खंदारे, रवींद्र ढोले, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, विजय बडेकर तसेच मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे आभार मानण्यात आले.
दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने सफाई कामगारांना न्याय मिळाला असून, हा संघटनेच्या एकजुटीच्या संघर्षाचा विजय आहे, अशी भावना बबलू सोलंकी यांनी व्यक्त केली.