कोरेगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारात नवीन पाच बस दाखल झाल्या असून, त्यांचे लोकार्पण काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरुणा बर्गे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष दीपाली बर्गे यांच्या उपस्थिती झाले. नवीन बसद्वारे प्रवाशांचे अधिकाधिक हित जोपासले जाईल, असा विश्वास डॉ. बर्गे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरेगाव आगाराला मध्यंतरी पहिल्या टप्प्यामध्ये नवीन पाच बस मिळाल्या होत्या. या नवीन बसमुळे प्रवाशांची काहीअंशी अडचण दूर झाली आहे. अजून नवीन बसची आवश्यकता होती. त्यानुसार अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आगारामध्ये आणखी नवीन पाच बस दाखल झाल्या. त्यांचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर, आगार व्यवस्थापक नीता जगताप, किसनराव सावंत, प्रशांत संकपाळ, प्रवासी संघटनेचे विलासराव शहा, विजय घोरपडे, अधिकारी, चालक- वाहक, प्रवासी उपस्थित होते.
आगामी काळात कोरेगाव आगाराला आणखी नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याद्वारे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होऊ शकेल. आता आगाराच्या आवारातील काँक्रिटीकरण पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी प्रचंड गैरसोय दूर झाली आहे. नजीकच्या काळात या बसस्थानकाचा संपूर्णतः कायापालट केला जाईल अशी ग्वाही, डॉ. बर्गे यांनी दिली.