मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होत असून यामुळं नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. राज्यात सध्या विदर्भातील चंद्रपूर इथं सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून हा आकडा 42 अंशांच्या घरात पोहोचला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दमट वातावरणात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र पहाटेच्या वेळी काही अंशी गारठा पाडत असला तरीही सूर्य माथ्यावर आल्यानंतर मात्र परिस्थिती बदलत आहे.
एकिकडे उष्मा प्रचंड प्रमाणात वाढत असतानाच राज्याला पुढील 4 दिवस पावसाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. राज्यात 19 ते 22 मार्चदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्याने संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागानं जारी केली आहे.
पुढील चार दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागासाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेच्या वाढल्या असून, मार्च महिन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे आल्याने राज्यात ऊन, वारा, पावसासह ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम असेल असंही सांगण्यात येत आहे. कोकण किनारपट्टी भागासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरणसदृश्य परिस्थिती असेल.
अतीव उत्तरेकडे असणाठऱ्या हिमाचल प्रदेश, काश्मीर, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश ते अगदी मध्य प्रदेशपर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. हिमालयापासून मध्य भारतापर्यंत वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग पाहता हवामानात सातत्यानं बदल होत असल्याचं सांगितलं जात आहे.