सातारा : वाढे फाटा, ता. सातारा येथे वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांच्या नाकाबंदी दरम्यान गाईंची वाहतूक करणार्या ट्रक संदर्भात शंका आल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तो ट्रक रोखला. ट्रकमध्ये नऊ गाई व वासरे कोंबून भरण्यात आल्याने एका वासराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी ट्रकची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, उत्तम नंदा डेअरी फार्म ही जालना जिल्ह्यामध्ये आहे. तेथून अपशिंगे येथील शंकर डेअरी फार्म येथे नऊ गाई ट्रक मधून नेल्या जात होत्या. सदर वाहनांमध्ये ही जनावरे कोंबून भरल्याने काही वासरे जखमी अवस्थेत आढळून आली, तर एका वासराचा मृत्यू झाला होता. ही वासरे व गायी ही कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे अजित सिंह भोसले, विक्रम विभुते, सोहम खुस्पे, राहुल राठोड, सुरज माने यांनी करत हा ट्रक रोखून धरला.
यावेळी ट्रक चालक व विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांच्या आंदोलकांची जोरदार बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी ट्रकच्या काचेची तोडफोड केली. घटनेचे वृत्त कळतात सातारा पोलीस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना शांत केले. पोलीस बंदोबस्तामध्ये अपशिंगे येथे हा ट्रक रवाना करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
वाढे फाटा परिसरात गायींची वाहतूक करणार्या ट्रकची तोडफोड, परिसरात तणावाचे वातावरण
by Team Satara Today | published on : 31 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा