सातारा : मागासवर्गीय समाजातील अतुल भिसे या युवकाने मराठा समाजातील वैभवी साळुंखे या मुलीशी लग्न केल्यानंतर पाच वर्षांनी त्यांना एक मुलगा जन्म दिला. त्यानंतर मुलीला हाताशी धरून, तिचे वडील डॉ. पंकज साळुंखे, आई व निवृत्त मुख्याध्यापिका माधुरी साळुंखे, चुलते डॉ. प्रसन्न साळुंखे, भाऊ ऋषीकेश साळुंखे, बहीण रोहिणी साळुंखे, जयदीप बामणे व दिग्विजय पवार यांनी जातीय द्वेषापोटी अतुलला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अतुल भिसेने 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी वैभवी व तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करुन, पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. उर्वरित तिघांना अटक झालेली नाही. त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपाइं गवई गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
अतुल भोसले आत्महत्याप्रकरणी गवई गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला छ. शाहू चौकातून सुरुवात झाली. अतुलला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा अतुलची आई, मुलगा, नातेवाईक, मित्र परिवार व आरपीआय गवई गटाच्या पदाधिकार्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले.
अतुल भिसे याच्या आई-वडिलांना समाजकल्याण विभागाकडून 50 लाख रुपयांची मदत तात्काळ घोषित करावी. अतुलच्या भावास शासकीय नोकरी द्यावी. तिघांचे पुनर्वसन करण्यात यावे. अतुलच्या आत्महत्याप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी गवई गटाचे राज्य अध्यक्ष जकाप्पा कांबळे. पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे, संजय गाडे, जिल्हाध्यक्ष गणेश भिसे, सुहास मोरे, सागर भिसे, सनी काटे,सुंदर ओव्हाळ, दयानंद नागटिळक, गणेश वाघमारे, विशाल कांबळे, रेखा सकटे, सुचित्रा कडाळे, अॅड. पायल गाडे, नलिनी घाडगे, राहुल कुमाने, विशाल भिसे, बाबू वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाची दखल घेत, येत्या काही दिवसात उर्वरित तीन संशयितांना अटक करण्याचे आणि मागण्या मान्य होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.