सातारा : ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त होण्यासाठी साताऱ्याच्या प्रतिसरकारमधील क्रांतिवीरांचे मोठे योगदान आहे. त्या सर्वांचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले.
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी १० सप्टेंबर १९४४ मध्ये सातारा तुरुंग फोडले. या घटनेला ८१ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह (जेल) येथे स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, कारागृह अधीक्षक रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक, हुतात्मा संकुलातील अनेक प्रमुख पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, ‘‘आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकारांनी प्रयत्न केले. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला नव्या पिढीला अभिमान आहे. १० सप्टेंबर हा दिवस सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. नव्या पिढीला हा इतिहास कळावा म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. या दिवसापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रतिसरकार स्थापन झाले, त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. तब्बल ६४० गावांमध्ये प्रतिसरकार होते. इंग्रज सरकारच्या सत्तेपुढे हे झुकले नाही.’’ नागनाथअण्णांची ही चळवळ, सातारा जेल फोडो ही घटना इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे, या घटनेतून प्रेरणा घेत सर्वांनी एकजुटीने देश एकसंध ठेवला पाहिजे. देशविघातक सर्व शक्ती, अतिरेक्यांशी मुकाबला करण्यासाठी एक राहिले पाहिजे. सर्व क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरव सर्वांनी केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
रमाकांत शेडगे म्हणाले, ‘‘डॉ. नागनाथअण्णांचे शौर्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांच्या शौर्यातून आम्हाला सर्वांना प्रेरणा मिळते. आता देश पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी तरुण पिढीवरच आहे.’’
यावेळी प्रतिसरकार स्मारक समितीचे प्रा. विजय निकम, असलम तडसरकर, शंकर पाटील, दत्ताजी जाधव, छत्रपती शिवाजी कॉलेज व कला वाणिज्य कॉलेज साताराचे अनेक प्राध्यापक, बाळासाहेब पाटील, कुमार शिंदे, दिलीप सूर्यवंशी, प्रा. राजा माळगी, विश्वास मुळीक, शिवाजी शंकर पाटील, राजाराम शिंदे, अजित वाजे, तुकाराम डवंग, नारायण कारंडे, जयकर चव्हाण, बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, यांच्यासह विविध चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.