सातारा : गुरुवार पेठेतील शेटे चौकातील अवधूत ज्वेलर्स दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दागिने, चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दुकानफोडी आणि दुचाकी चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आले.
रिहान अन्वर शेख (वय २०, रा. शनिवार पेठ, तेलीखड्डा, सातारा) आणि शुभम ऊर्फ सुभाष सुरेश हादगे (वय १९, रा. केसरकर पेठ, मानस हॉटेलमागे, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ या वेळेत चोरट्यांनी अवधूत ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून सोन्या-चांदीचे दागिने, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर चोरून नेला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.
चोरट्यांनी ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही यंत्रणाही चोरून नेल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. चोरट्यांची माहिती घेत असताना एका संशयित आरोपीचे नाव समजून आले. तो अभिलेखावरील सराईत चोरटा असल्याने व त्याचा निश्चित राहण्याचा ठाव ठिकाणा नसल्याने त्याचे शोधासाठी पोलीस विविध ठिकाणाहून माहिती प्राप्त करीत होते. परंतू आरोपीबाबत निश्चीत माहिती मिळून येत नव्हती. सदरचा चोरटा इसम हा एका विनानंबरचे दुचाकीवरुन राजवाडा परिसरात फिरत असलेबाबत मिळाले गोपनीय माहितीवरुन डी.बी. पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेतले. सदर संशयीत इसमाकडे चौकशी केली असता तो सर्वप्रथम उडवाउडवीची उत्तरे देवु लागला परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा दुसरे साथीदारासह सातारा शहर हददीमधुन एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरी करुन त्यावरुन घटनास्थळी जावुन चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचे दुसरे साथीदारास शाुहुपुरी हददीतुन ताब्यात घेण्यात आले. सदर चोरटयाकडून गुन्हयातील चोरीस गेलेला सोन्या, चांदीचा मुददेमाल, गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन, मोबाईल फोन असा एकुण १०.३० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे, पो. हवा. निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, समीर महागडे, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ.तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, मÏच्छद्रनाथ माने, वैभव माने, सुशांत कदम यांनी तपासात सहभाग घेतला.
सातारा शहर पोलिसांची कारवाई: ज्वेलर्स दुकानफोडीप्रकरणी दोघांना अटक; १०.३० लाखांचा ऐवज जप्त,
by Team Satara Today | published on : 10 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा