ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

by Team Satara Today | published on : 06 February 2025


मुंबई : लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज निधन झाले. गेले काही महिने त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते, त्यावर मात करत त्यांनी हिमतीने आपली ‘सेकंड इनिंग’ही सुरु केली. मात्र लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी ‘दैनिक देशदूत’साठी क्रीडा या विषयावर काही काळ लिखाणही केले होते.

पेशानं सिव्हिल इंजिनिअर असलेले द्वारकानाथ संझगिरी सुरुवातीच्या काळात मुंबई महापालिकेत नोकरी करत होते. मात्र, क्रिकेट आणि मराठी साहित्याविषयी त्यांचा गाढा अभ्यास होते. द्वारकानाथ संझगिरी म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील किश्श्यांची मैफल होती. मात्र ही मैफल अर्ध्यावर सोडून संझगिरींनी चाहत्यांना मोठा धक्का दिला. द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले होते. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. 

त्याचबरोबर द्वारकानाथ संझगिरी यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. १९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार  केले जाणार आहेत.

मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या शोकभावना

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार  यांनी लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “अतिशय दु:ख वाटलं, द्वारकानाथ संझगिरी हे क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचं ज्ञान असलेले, क्रिकेट, क्रिकेटीयर्स, क्रिकेट रेकॉर्डर्स याचे इनसायक्लोपीडिया असलेले, क्रिकेटच्या संदर्भातील प्रसंग याचं विश्लेषण करणारे आमचे मित्र संझगिरी गेले याचं दु:ख झाले असे त्यांनी म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा
पुढील बातमी
यूरिक एसिडची पातळी कमी करण्यासाठी विड्याची पाने गुणकारी

संबंधित बातम्या