खटाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) उभारले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन कार्यक्रमामध्ये बोलताना उमेद मॉल्स उभारण्याचा शब्द दिला होता.
राज्यभरातील बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना मुंबईकरांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद वेळोवेळी अधोरेखित झाला आहे. याठिकाणी माफक दरात मिळणार्या वस्तू, त्यांचे पॅकेजिंग हे मल्टिनॅश्नल कंपन्यांपेक्षा दर्जेदार असल्याचे अधोरेखित करून बचतगटांसाठी कायमस्वरुपी मार्केट व्यवस्था उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद’च्या माध्यमातून मॉल उभारणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेण्यात आला असून ग्रामविकास विभागांतर्गत ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात ‘उमेद मॉल’उभारण्यात येणार आहेत.