अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा शहर डीबी पथकाची कामगिरी

by Team Satara Today | published on : 08 July 2025


सातारा : सातारा शहर पोलिसांनी कुख्यात गुन्‍हेगाराकडून एक गावठी पिस्‍टल व दोन जिवंत काडतुसे जप्‍त केली. निकेत वसंत पाटणकर (वय ३२, रा.चंदननगर, कोडाेली) असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

संशयित निकेत पाटणकर याच्या विरुध्द सातारा जिल्हयात खंडणी, जबरी चोरी, मारामारी, हाफ मर्डर, मोक्का व आर्म ॲक्ट असे सुमारे १६ हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सराईत गुंड पाटणकर याला दोन वर्षासाठी तडीपार देखील केले होते. दरम्‍यान, तो सातारा शहर परिसरातील एमआयडीसी परिसरातील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडून खंडणी मागत होता. खंडणी न दिल्याने एका हॉटेलची त्‍याने तोडफोड केली. या गुन्‍ह्यानंतर तो पसार झाला होता. यामुळे त्‍याची दहशत निर्माण झाली होती. गुन्हा घडल्‍यापासून तो सुमारे तीन महिने पसार होता. पोलिस हरतर्‍हेने त्‍याचा शोध घेत होते.

संशयित निकेत पाटणकर हा सोमवारी रात्री उशीरा सातारा शहर परिसरातील जानाई मळाईच्या पायथ्याला येणार असल्‍याचे पोलिसांना समजले. तो स्वतःजवळ गावठी पिस्टल बाळगून असल्‍याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे त्‍याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता. पोलिसांनी त्‍याला पाहिल्‍यानंतर ताब्यात घेतले असता त्‍याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत राउन्ड मिळून आले.

पोलीस अधिक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोनि राजेंद्र मस्‍के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस सुजीत भौसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्व. आनंदराव व प्रेमलाकाकी चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
पुढील बातमी
कराडात विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांचे धरणे आंदोलन

संबंधित बातम्या