सातारा : येथील हिंदवी पब्लिक स्कूल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अभिनव उपक्रम घेणारी शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित आहे विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव देत त्यांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे यासाठी शाळा व्यवस्थापन सदैव प्रयत्नरत असते. ‘भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष’ व ‘वंदे मातरम या गीताचे सार्धशती वर्ष’ अशा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हिंदवी पब्लिक स्कूलमधील इयत्ता सहावी ते दहावीच्या 280 विद्यार्थ्यांच्या सहभागाने 35 शिक्षकांच्या द्वारे साताऱ्या शहरातील प्रमुख 108 चौकात पथनाट्याचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने 100 पथनाट्य सादर करण्याचा हिंदवी पब्लिक स्कूलचा संकल्प होता. मा सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी संघशताब्दीच्या निमित्ताने भारतीय बांधवांना ‘पंच परिवर्तन’ याद्वारे, भारतीय संस्कृतीचा बोध, सामाजिक समरसता, नागरि कर्तव्य, पर्यावरण व सशास सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी कुटुंबाचे महत्त्व अशा अर्थाचे विषय प्राधान्याने अंगीकारण्यासाठी सुचवले आहेत. भारतात सर्वोच्च स्थान असलेले संविधान हा एक विषय व पंच परिवर्तनाचे पाच प्रमुख विषय विद्यार्थ्यांमध्ये बालवयात रुजले तर त्याचा प्रभावी परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो हा विचार मनाशी धरून या विषयांशी अनुषंगिक विविध नाटकांचे लेखन करण्यात आले. सुमारे 30 नाटके सादर केली गेली. सदरच्या नाटकांचा आशयाबाबत श्री महेश शिवदे यांच्याशी विचार विनिमय करून विषय हाताळणी बाबतचे प्रारूप ठरवण्यात आले. यापैकी प्रत्येक विषयाचे एक अशी सहा नाटके तज्ञांच्या माध्यमातून निवडली गेली. या निवड प्रक्रियेमध्ये घटनेचे जाणकार व पंचपरिवर्तन विषयातील विविध क्षेत्रातील तज्ञ यांचा सहभाग होता. कायदेतज्ञ म्हणून विधीज्ञ सौ रेशमा वाळींबे, श्री. योगेंद्र सातपुते, अविनाश सुतार, योगशिक्षिका डॉ शीतल इनामदार, डॉ समीर सोनी, श्री. कल्याण राक्षे, श्री जयदीप ठुसे, सौ रसिका केसकर, श्री संजय गोसावी, श्री. जितेंद्र बाबर, श्री शेखर कुलकर्णी, आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी नाटकांचे परीक्षण करून प्रत्येक विषयाचे एक नाटक निवडले.
हिंदवी गुरुकुल च्या कार्यकारी संचालिका सौ. रमणी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला. सदरचे नाटक विषयवार विद्यार्थ्यांमध्ये विभागून सहा विषयांवर आधारित 108 नाटकांचे सादरीकरण आज बुधवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडले. सकाळी 10 ते 12 या वेळेत सातारा शहरातील प्रमुख चौक अशा ठिकाणी गटागटांनी सादरीकरण करण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. नाटक पाहून लोकांमधून समाधानाची व कौतुकाची प्रतिक्रिया पहावयास मिळाली. लोक ठीक ठिकाणी थांबून या नाटकाचा आस्वाद घेत होते व सादर केलेल्या विषयांविषयी चर्चा करत होते. स्वयंप्रेरणेने सहकार्य करणारे अनेक नागरीक उत्साहाने सहभाग नोंदवत होते.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सातारा शहर पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, समाज बांधव, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती सुपेकर, सौ शिल्पा पाटील, श्री संदीप जाधव श्री. श्रीकृष्ण सपकाळ यांनी या सर्व नियोजनामधे बारकाईने लक्ष घालून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभाग नोंदवला. या शंभरहून अधिक ठिकाणी झालेल्या सार्वजनिक उपक्रमात पालकांनी अत्यंत उत्साहाने व मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांनी अत्यंत जबाबदार वर्तनाचे दर्शन देऊन उत्तम सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे शाळेत एकत्रिकरण करण्यात आले. समारोपाच्याप्रसंगी बोलताना श्री अमित कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे अभिनंदन करून सातारकर नागरिकांचे मनोमन आभार मानले. 108 नाटकांच्या सादरीकरणाचे 108 पुष्प भारतमातेच्या चरणावर समर्पित केल्याचा भाव व्यक्त केला.