पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो. मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या मार्चपर्यंत उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेत सहभागी २९ हजार ५०१ पैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. तर १० हजार १३५ वीजग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली आणि ५९०८ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेसाठी आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. तर २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.
फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असलेल्या या अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.
महावितरण अभय योजनेचे ठळक मुद्दे –
» घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी.
» मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीजजोडणी उपलब्ध.
» मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट.
» मूळ थकबाकीची ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा व्याजमुक्त हप्त्यांत भरण्याची सोय.
» दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीजग्राहकांना संधी.
» महावितरण अभय योजना येत्या दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार.