तळमावले : साताऱ्यात तब्बल 32 वर्षानंतर 99 वे साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन ‘न भूतो भविष्यती’ करण्याचा चंग सातारकरांनी मांडला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपूरी शाखा, मावळा फौंडेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी व शिष्टमंडळाने संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी एक अक्षरगणेशा संमेलनासाठी उपक्रम राबवला आहे. यामध्ये फक्त रु.99 मध्ये अक्षरगणेशा रेखाटून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे डाकवे यांनी अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 9 वे वर्ष असा अनोखा योगायोग जुळून आला आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून घ्यायचा त्या बदल्यात त्यांना रु.99 किंवा त्या पटीत कितीही मूल्य द्यायचे आहे. हे मूल्य सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणार आहे. यामुळे आपणास अक्षरगणेशा मिळेलच परंतू संमेलनात खारीचा वाटा उचलण्याचे समाधानही मिळेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केला आहे. बुधवार दि.27 ऑगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. शनिवार दि. 6 सप्टेंबर, 2025 अखेर हा उपक्रम चालणार आहे.
संदीप डाकवे हे गेली सुमारे 20 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे. संदीप डाकवे यानी कलेच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुपयाची रोख मदत केली आहे. सार्वजनिक मंडळ अक्षरगणेशा उपक्रम राबवल्यास साहित्य संमेलनासाठी भरघोस मदत करता येईल.
अक्षरगणेशाकार असलेले संदीप डाकवे यांची 12 पुस्तके प्रकाशित झाली असून 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी साहित्य चळवळीला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा, निबंध स्पर्धा, वार्तांकन स्पर्धा, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत, साहित्य पुरस्कार, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचं झाड, स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय, पुस्तक भेट अभियान, पुस्तकांची आरास, पुस्तकांची गुढी, शासनाच्या वाचन संकल्प उपक्रमात सहभाग, ग्रंथालयांना पुस्तके वाटप, स्पंदन एक्सप्रेस इ.प्रकारचे मधून लिखाणाला प्रोत्साहन वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मंदीर जीर्णोद्धारासाठी रु.63 हजार, नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु. 21 हजार, विविध सामाजिक उपक्रमासाठी 10 हजार, अन्नदानासाठी 7 हजार 778, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.6 हजार, ईशाळवाडी आपत्तिग्रस्तांसाठी रु.5 हजार 555, ईशिता पाचुपतेला रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, भैरी पाणी योजनेसाठी रु. 5 हजार, वैद्यकीय उपचारासाठी रु. 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला रु.4 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस रु.3 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, भारत के वीर या खात्यात रु.1 हजार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक रु.1 हजार (प्रतिवर्षी) अशी रोख स्वरुपात मदत केली आहे.
संदीप डाकवे यांनी राबवलेल्या विविध उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तीनदा, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड बुक मध्ये दोनदा आणि हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन मध्ये एकदा झाली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी 30 पेक्षा जास्त स्पेशल रिपोर्ट तर सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवर अर्ध्या तासाची मुलाखत प्रसारित केली आहे. संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी 75 पेक्षा जास्त तर महाराष्ट्र शासनाने 6 पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले आहे.
एक अक्षरगणेशा साहित्य संमेलनासाठी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक. 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे व्दारे अक्षरगणेशाचे मुल्य जमा करायचे आहेत, असे आवाहन शेतीमित्र संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.