दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनने लॉकडाऊनमध्ये ९ जून २०२१ रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं. पण, या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. दिशाच्या मृत्यूनंतर जवळपास ४ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही, असं म्हणत या प्रकरणाची पुन्हा नव्याने सीबीआय चौकशी व्हावी असं या याचिकेत म्हटलं गेलं आहे. याबरोबरच आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण, त्यासोबतच आणखी एक धक्कादायक दावा याचिकेत करण्यात आला आहे.
दिशा सालियनच्या वडिलांनी वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोपही केले आहेत.
याचिकेत काय म्हटलं?
पोलिसांच्या दाव्यानुसार, दिशा सालियान हिचा १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. परंतू तिच्या शरिरावर कुठेही फ्रॅक्चर नव्हते. फोटोग्राफिक पुराव्यांनुसार हे सिद्ध होतेय ती अधिकृत पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. आरोपीला वाचविण्यासाठी तेव्हा राजकीय दबाव टाकला गेला होता. दिशाच्या घरी एक छोटी पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला तिच्या मित्रांसह आदित्य ठाकरे, त्यांचे बॉडीगार्ड तसेच सुरज पांचोली, डिनो मारियो सहभागी झाले होते. तिच्यावर तेव्हा सामुहिक बलात्कार झाला होता, असा दावा सतीश सालियान यांनी याचिकेत केला आहे.
आदित्य ठाकरेंचे रिया चक्रवर्तीला ४४ फोन कॉल!
दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच सुशांत सिंग राजपूतनेही आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. या काळात आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती संपर्कात होते. आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ फोन कॉल केल्याचा धक्कादायक दावा या याचिकेत करण्यात आला आहे.