सातारा जिल्हा न्यायालयात दोन्ही राजे एकत्र

सुरुची राडा प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग, तर नवीन मार्केट कमिटी प्रकरण निकाली

by Team Satara Today | published on : 15 March 2025


सातारा : जुन्या दोन प्रकरणावरुन सातारा जिल्हा सत्र न्यायालयात आज खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आल्याचे पहायला मिळाले. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी माघारी घेतल्यामुळे खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीचे प्रकरण न्यायालयाने निकाली काढले आहे, तर सुरुची राडा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातार्‍यातील 2017 मधील सुरुची राडा प्रकरण आणि नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यासह मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरु आहेत. या प्रकरणात आज दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. यामध्ये आज न्यायालयाने खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लागला. यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला आहे. आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून 2017 मध्ये शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळे ते सेशन कोर्टातून जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या दोन्ही खटल्यांत सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजेंनी उपस्थिती लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पहायला मिळाली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
90 टक्के लोक करतात दही खाताना चूक!
पुढील बातमी
कचऱ्याच्या नावाखाली झाड पेटवण्याचा प्रयत्न

संबंधित बातम्या