सातारा पालिका निवडणूक सर्व उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील; दोन्ही राजांचे मनोमीलन; नगरसेवक, नगराध्यक्षपदासाठी मुलाखती

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा : सातारा पालिका निवडणुकीत दोन्ही राजांचे मनोमीलन होणार का, याबाबतच्या चर्चेला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पूर्णविराम दिला आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आग्रहामुळे दोन्ही राजांचे मनोमीलन अंतिम मानले जात आहे. सातार्‍यात हॉटेल फर्न येथे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी पार पडल्या.

पालिका निवडणुकांसाठी भाजपचे जिल्ह्याचे प्रभारी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मुलाखती झाल्यानंतर, आढावा घेण्याकरिता पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे प्रश्नांना उत्तरे दिली. मनोमिलनाच्या प्रश्नावर ते म्हणाले, सातारा पालिकेची निवडणूक नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदाचे उमेदवार कमळ या चिन्हावर लढवणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले व मी एकाच पक्षात असून, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहोत. त्यामुळे मनोमिलनाबाबत तुम्ही वेगळे प्रश्न का विचारताय?

सातारा पालिकेच्या 50 नगरसेवकपदांसाठी प्रत्येक प्रभागातून दहा याप्रमाणे तीनशेहून अधिक इच्छुकांनी आणि नगराध्यक्षपदासाठी 22 इच्छुकांनी पक्षाच्या पॅनेलसमोर मुलाखती दिल्या. नगराध्यक्षपदासाठी 18 पुरुष आणि चार महिला उमेदवार इच्छुक आहेत. प्रदेश कार्यकारिणीचे विक्रम पावस्कर, सातारा विधानसभा मतदारसंघ संयोजक अविनाश कदम सातारा विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर, पक्षाचे सरचिटणीस विठ्ठल बलशेइवार, माजी शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या पॅनेलसमोर या मुलाखती झाल्या. सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत दोन टप्प्यांमध्ये मुलाखती घेण्यात आला.

तब्बल तीनशेहून अधिक उमेदवारांची माहिती घेऊन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उद्या, दि. 11 रोजी मुंबईला रवाना होणार आहेत. राज्यातील 242 नगरपालिकांचा आढावा पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील 233 नगरसेवकपदे व दहा नगराध्यक्षपदांसाठी इच्छुक उमेदवारांचा अहवाल ना. शिवेंद्रसिंहराजेहे मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत. प्रत्येक प्रभागातून तीन उमेदवारांचा पसंती कौल घेतला जाणार आहे. त्यामध्ये खासदार गट आमदार गट यांचे मेरिटचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी सक्षम, ताज्या दमाचे, नवे चेहरे असा निकष असल्याचे सूत्रांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुस्तके जीवनावश्यक बनली तरच ग्रंथ संस्कृतीला चालना ; ग्रंथ महोत्सवाच्या समारोप सत्रामध्ये प्राध्यापक राजा दीक्षित यांचे प्रतिपादन
पुढील बातमी
कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढा-मनसेची मागणी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

संबंधित बातम्या