पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे सव्वासहा हजार घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास आणखी २० दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी आता २० नोव्हेंबर अंतिम मुदत असेल. नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता व इतर कारणांमुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत होती. त्यानुसार ही मुदतवाढ दिल्याची माहिती ‘म्हाडा’चे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. या सोडतीसाठी आतापर्यंत ६२ हजार ११ अर्ज आले असून ३५ हजार ९१३ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. ही सोडत ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
‘म्हाडा’ने पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ६ हजार १६८ घरांची सोडत काढली आहे. अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती ११ सप्टेंबरपासून सुरू झाली असून अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता व इतर कारणांमुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत होती. त्यानुसार ही मुदतवाढ दिल्याची माहिती ‘म्हाडा’चे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. नवीन वेळापत्रकानुसार अर्ज करण्यासाठी तसेच ऑनलाइन रक्कम भरण्यासाठी २० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर बँकेत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी २१ नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली असून ११ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती साकोरे यांनी दिली.
दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील १ हजार ३०० शिल्लक राहिलेली घरेही या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या सोडतीत आतापर्यंत ६२ हजार ११ अर्ज आले असून, ३५ हजार ९१३ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६२ कोटी २५ लाख २८ हजार ५८४ रुपयांची अनामत रक्कम जमा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.