सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील एका इमारतीला रात्री आग लागली. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्त्वात या साखर कारखान्याचं कामकाज चालतं.
पाटण तालुक्यातील दौलतनगर- मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेवेळी उभारलेल्या शेती ऑफिसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग जवळपास अडीच ते तीन तास सुरु होती. आग विझवण्यासाठी मरळी सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, जयवंत शुगर यासह कराड नगरपालिकेचीही अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग पाहण्यासाठी रात्री लोकांनी मोठी गर्दी केली होती.
कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात काही दिवसांपूर्वी बॉयलरच्या टेस्टिंगवेळी स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काहीच दिवसात आता पाटणच्या साखर कारखान्यातील आगीची घटना समोर आली आहे.