सातारा : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांमधील अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेकडे दाखल असणा-या अर्धन्यायिक प्रकरणांचे अनुषंगाने दि. 4 एप्रिल, 18 एप्रिल व 2 मे रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सकाळी ११ वा. लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने यांनी दिली.
लोकअदालतीमध्ये सहभागी होणा-या पक्षकार व विधिज्ञ लोकअदालतीमध्ये सहभागी होण्यासाठी विहित अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज लोकअदालतीच्या दिनांकापूर्वी १ आठवड्यापर्यंत सातारा जिल्ह्यासाठी अर्ज सादर करण्यासाठीचा मोबाईल क्रमांक ९५२७१६१७६३ वर व्हॉटस्अॅपद्वारे पाठविणे आवश्यक आहे. मुदतीमध्ये प्राप्त होणा-या अर्जाचे अनुषंगाने ठरविणेत आलेल्या दिवशी व ठिकाणी लोक अदालतीमधील कामकाजामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणांतील आवश्यक पक्षकारांना लोकअदालतीच्या वेळी व ठिकाणी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी अर्ज सादर करणा-या पक्षकारांची राहिल, असे पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.