लोणंद : फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरी सुरू आहे. ही माहिती समजल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या शासकीय वाहनावर जेसीबी चालवून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणी एका संशयितासह दोन अज्ञात चालकांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी शेळके (रा. निंबोडी, ता. खंडाळा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (दि. २०) रात्री तांबवे धरण परिसरात छापा टाकला. त्यावेळी धरणातील माती जेसीबीच्या साहाय्याने बिगर क्रमांकाच्या टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले.
कारवाई सुरू होताच जेसीबी चालकाने (एमएच १० एस ७८१८) या क्रमांकाच्या जेसीबीची फरांडी महसूल विभागाच्या शासकीय वाहनावर आदळून वाहनाचे नुकसान केले. त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात जेसीबी पलटी झाली. मात्र बिगर क्रमांकाचा टिप्पर घेऊन दुसरा चालक पसार झाला.
याप्रकरणी तानाजी शेळके (रा. निंबोडी, ता. खंडाळा) तसेच जेसीबी व टिप्परवरील अज्ञात चालकांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे व गौण खनिज चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. जगताप तपास करीत आहेत.