सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा : सातारा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारत पंचायत समितीवर सत्ता काबीज केली. सभापतीपदी कोंडवे गणातील भाजपचे सदस्य महेश गाडे विजयी झाले, तर उपसभापतीपदी अतीत गणातील भाजपच्या सुषमा जाधव यांची निवड झाली. या निकालामुळे सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

\निवडीनंतर नूतन सभापती श्री. गाडे व उपसभापती सुषमा जाधव यांचा भाजप नेते, व सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोमवारी (दि. १६) सातारा पंचायत समितीच्या सभागृहात सातारा पंचायत समितीसाठी सभापती व उपसभापती निवडणूक बैठक पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी आशिष बारकूल यांनी काम पाहिले, त्यांना तहसीलदार समीर यादव व गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी सहकार्य केले. यावेळी सातारा पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सकाळी अकरा वाजता भाजपच्यावतीने सभापती पदासाठी कोंडवे गणातील महेश गाडे यांनी तर उपसभापती पदासाठी अतित गणातील सौ. सुषमा जाधव यांनी अर्ज भरला. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी व इतर विरोधी पक्ष सदस्यांच्यावतीने राहुल कापले व स्वप्नाली फडतरे यांनी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान, सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत कोंडवे गणातील भाजपचे सदस्य महेश गाडे यांच्या बाजूने १० मते पडली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कापले यांना ६ मते मिळाली. त्यामुळे महेश गाडे यांनी बहुमत मिळवत सभापतीपदावर विजय मिळवला.

तसेच, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अतीत गणातील भाजपच्या सुषमा जाधव यांच्या बाजूनेही १० मते पडली. तर वर्णे गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नाली फडतरे यांना ६ मते मिळाली. त्यामुळे सुषमा जाधव यांनी उपसभापतीपदाची निवडणूक जिंकत भाजपची सत्ता अधिक मजबूत केली. या निकालामुळे सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच समर्थक व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच गुलाल उधळत विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महेश गाडे आणि सुषमा जाधव यांचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन
पुढील बातमी
मानिनी जत्रेत सातारकरांनी वाढवली महिलांची 'उमेद'; सात दिवसात ७२ लाखांची उलाढाल; सातत्याने विक्री प्रदर्शन भरवण्याची बचत गट महिलांकडून मागणी

संबंधित बातम्या