सातारा : येथील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये साताराचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण हे जखमी झाले आहे त्यांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यामध्ये वनरक्षक सुहास काकडे, महेश अडागळे, सचिन कांबळे, मयूर अडागळे हेही जखमी झाले आहेत. जखमी बिबट्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. यानंतर दुपारी पावणे चारच्या दरम्यान हे पथक उंटाचा डोंगर परिसरात दाखल झाले. प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने टाकण्यात आलेल्या जाळीमध्ये बिबट्या सापडला नाही. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने चव्हाण यांच्या अंगावर उडी मारून त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीमध्ये त्यांच्या अंगाला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच इतरही कर्मचारी जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यानंतर जखमी बिबट्यास सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी- कर्मचारी, सातारा रेस्क्यू टीम आणि ओमकार ढाले, मयूर तिखे, ओंकार आडागळे, हर्षल मदने, अनिकेत जंगम, शुभम औंधकर यांनी जेरबंद केले. यानंतर बिबट्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठवून देण्यात आले आहे.