सातारा : काशीळ (ता. सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयासमोर महामार्ग ओलांडत असताना बसची धडक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सुधीर सदाशिव जाधव (वय 39, रा. काशीळ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 22 रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास सुधीर जाधव हे काशीळ येथील ग्रामीण रुग्णालयासमोरून पूर्वेकडील बाजूने रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडत होते. त्याचवेळी सातारा ते कराड मार्गावरून सांगलीकडे जाणार्या सांगली आगाराच्या शिवशाही बसने (क्रमांक MH 06 BW 3725) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सुधीर यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत होऊन ते महामार्गावरच कोसळले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद शिवानंद रामचंद्र जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
या फिर्यादीवरून बोरगाव पोलिसांनी बस चालक नितीन उद्धव मोरे (रा. चायगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा; सध्या रा. हरिपूर रोड, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारळे करत आहेत.