सातारा : राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या नेतृत्वात कराड नगरपालिकेच्या वाढीव भागातील बर्गे मळा या ठिकाणी सुविधा नसलेबाबत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, कराड नगर परिषद हद्दीतील वाढीव भागातील बर्गे मळा या ठिकाणी गटार नाहीत. पाणी एक वेळ येत आहे. परंतु तेही व्यवस्थित नाही. रस्ता पूर्ण चिखलात आहे. ड्रेनेजची लाईन टाकलेली आहे; परंतु त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन कार्यान्वित नाही. या सर्व सुविधा नगरपालिकेने देणे आवश्यक असताना याकडे मात्र नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. पावसाळा सुरू असतानाही या ठिकाणी लहान मुलांसह वृद्ध नागरिकांना ये-जा करता येत नाही. गटार नसल्यामुळे या ठिकाणी पाणी साठल्यामुळे रोगराई पसरत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्याधिकारी कराड नगरपरिषद कराड यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन यावर मार्ग काढावा व तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
येत्या दोन-तीन दिवसात नगरपालिकेने लक्ष न दिल्यास नगरपालिका कार्यालयाबाहेर संघटनेच्या वतीने बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येईल, असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला, कराड तालुका कार्याध्यक्ष सागर लादे, कराड शहराध्यक्ष विकी शहा, कराड शहर उपाध्यक्ष पंकज मगर, कराड तालुका मार्गदर्शक राकेश पवार, कराड शहर कार्याध्यक्ष साजिद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते साबीर मुजावर, आसिफ कागदी उपस्थित होते.