'सैयारा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'या' नवोदित अभिनेत्रीचा प्रवास

by Team Satara Today | published on : 24 July 2025


यशराज फिल्म्स निर्मित 'सैयारा' चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून, केवळ सात दिवसांतच चित्रपटाने 152 कोटींपेक्षा जास्त कमाईचा टप्पा गाठला आहे. दिग्दर्शक मोहित सूरीच्या रोमँटिक ड्रामा शैलीतील पुनरागमनाचे हे प्रतीक मानले जात आहे. या चित्रपटात दोन नवोदित कलाकार- अहान पांडे आणि अनीत पड्डा - प्रमुख भूमिकेत आहेत. अहानबद्दल सोशल मीडियावर आधीपासूनच बरीच चर्चा झाली असली तरी अनीत पड्डाबद्दल माहिती तुलनेने कमी आहे.

14 ऑक्टोबर 2002 रोजी अमृतसरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली अनीत पड्डा बॉलिवूडच्या ग्लॅमर वर्तुळापासून पूर्णपणे दूर वाढली. कमी वयातच तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आणि जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला इतर संधीही मिळाल्या. दिल्ली विद्यापीठातील जीझस अँड मेरी कॉलेज मधून पदवी घेत असताना तिने मॉडेलिंग सुरूच ठेवले.

अनीत पड्डाने डेअरी मिल्क चॉकलेटसह अनेक लोकप्रिय ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. 2022 मध्ये काजोल अभिनीत 'सलाम वेंकी' चित्रपटात ती पहिल्यांदा एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून दिसली होती. त्यानंतर तिला एक मोठे काम मिळाले ते Amazon Prime Video वरील 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' या सिरीजमुळे, जिथे ती पूजा भट्ट, रायमा सेन आणि झोया हुसेन यांच्यासोबत दिसली. शोच्या दिग्दर्शिका नित्या मेहरा आणि करण कपाडिया यांना तिने स्वतःचे 'बॉम्बे पॅरेंट्स' म्हटले आहे.

गायनाची आवड असलेल्या अनीतने 2024 मध्ये तिचं पहिलं गाणं 'मासूम' रेकॉर्ड केलं. त्याच वर्षी ती 'युवा सपनों का सफर' या टीव्ही शोमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली, जिथे तिचं नाव अनीत कौर असं श्रेय दिलं गेलं.

2025 मध्ये मोहित सूरी यांनी सैयारा चित्रपटासाठी अनीत पड्डाची निवड केली. या चित्रपटाला सुरुवातीला नाव देण्यात आलं नव्हते. दिग्दर्शकांनी सांगितले की, त्यांना त्यांचा या चित्रपटासाठी अगदी नवे चेहरे हवे होते. सैयारा चित्रपटासाठी झालेल्या ऑडिशनमध्ये अनेक मुलगी सहभागी झाल्या. मात्र, अनीतच्या परफॉर्मन्सने मोहित आणि यशराज फिल्म्सला इतकं प्रभावित केलं की तिला लगेच मुख्य भूमिकेसाठी साईन करण्यात आलं. हा चित्रपट प्रदर्शित होताच हाऊसफुल ठरला. या चित्रपटातील अनीत पड्डा आणि अहान पांडेची जोडी प्रेक्षकांना फार आवडली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंडीमध्ये एचआरटीसी बसचा भीषण अपघात
पुढील बातमी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनता बँकेवरील सर्व निर्बंध शिथिल

संबंधित बातम्या