प्रयागराज : सध्या सगळीकडेच महाकुंभाची मोठी चर्चा आहे. तब्बल १४४ वर्षानंतर जुळून आलेल्या या महाकुंभाच्या योगात अनेकांनी शाही स्नान करून सहभाग घेतला. यंदाच्या महाकुंभाचं विशेष महत्त्व आहे. तीन पिढ्यानंतर एकदा अनुभवायला मिळणारा महाकुंभ यंदाच्या वर्षी भरला आहे. अनेक सेलिब्रिटी देखील महाकुंभात जाऊन शाही स्नान करताना दिसत आहेत. आता मराठी मनोरंजन विश्वातील मोठं नाव असणारे अभिनेते-निर्माते प्रवीण तरडे हे देखील प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आपली पत्नी स्नेहल तरडे सोबत त्रिवेणी संगमात शाही स्नान केले.
याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रवीण तरडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडेही देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ही जोडी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आता स्नेहल तरडेने आपल्या सोशल मीडियावर प्रयागराजमध्ये जाऊन शाही स्नान केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी स्नेहल हे दोघेही प्रयागराजमध्ये पोहोचताना दिसले आहेत. तर, शाही स्नान आणि पूजा करण्यापूर्वी त्यांनी करून गंगा मातेला नमस्कार करून या संगमात स्नान केले आहे.
त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटले की, ‘अद्भुत अनुभव… त्रिवेणी संगम स्नान, २९ जानेवारी २०२५, मौनी अमावस्या, महाकुंभ २०२५, प्रयागराज, उत्तर प्रदेश.’ आता प्रवीण तरडे यांच्या या व्हिडिओवर अनेक जण भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. तर, चाहत्यांना देखील आपल्या लाडक्या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.
प्रवीण तरडे यांनी त्रिवेणी संगमावर व्हिडिओ बनवत म्हटलं की, ‘मी त्रिवेणी संगमावर आलो आहे. सगळ्यात शुभमुहूर्तावर मी अमृत स्नान करायला आलो आहे. सगळ्या परिसरात भाविकांची गर्दी जमली आहे,’ असं म्हणून त्यांनी प्रयागराज मधील या गर्दीचे झलक दाखवली होती. प्रवीण तरडे यांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पोहोचल्यानंतरही चित्रपटाचे प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही. त्रिवेणी संगमाच्या गर्दीकडे बघून ते म्हणाले की, ‘इथलं वातावरण बघून असं वाटत आहे की, मुक्काम पोस्ट प्रयागराज झालं आहे. यावरून आठवलं की, आपला चित्रपट ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माझ्या जवळच्या मित्रांनी बनवलेला हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.'