सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक खाती, संस्थाची खाती आणि सरकारी योजनेच्या खात्यामध्ये दावा न केल्या ठेवी असून त्या संबंधित खातेदारांना उपलब्ध करून देण्याकरता सातारा जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने सर्व बँकांच्या सहयोगाने जिल्ह्यात 31 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांनी दिली.
ज्या खात्यांमध्ये मागील 10 वर्षात व्यवहार झालेले नाहीत अशा निष्क्रिय खात्यांमधील ठेवी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात. खातेदारांनी पैसे गमावलेले नाहीत त्यांना त्यांचे पैसे परत मिळू शकतात. त्याकरीता खातेदारांनी आपल्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. दावा न केलेल्या ठेवींचा जलद निपटारा सुकर करण्यासाठी विशेष मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 25 या कालावधीत संपूर्ण देशात सर्व बँकांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. दावा न केलेल्या या ठेवी संबंधित खातेदारांना देण्याकरीता सातारा जिल्ह्यामध्ये सर्व बँकांच्या माध्यमातून जनजागृती शिबीरांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरीता खातेदारांनी, मयत खातेदारांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता आपल्या बँक शाखेत करून ठेवी परत घ्याव्यात असे आवाहन नितीन तळपे यांनी केले.