कोयना धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा; कोयनेचे सहा दरवाजे एक फुटाने उचलले, नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा

by Team Satara Today | published on : 31 July 2026


पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला दमदार पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण व सध्याचा उपलब्ध ८४.७७ टीएमसी पाणीसाठा, यापुढे २०.४८ टीएमसी शिल्लक पाणी साठवण क्षमता आणि सध्या सरासरी २५,२९३ क्युसेक आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून ५,०७९ व धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १,०५० असे एकूण ६,१२९ क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

धरणातून सोडलेल्या पाण्यासह पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पडणारा पाऊस, यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय धरणात ज्या पटीत पाण्याची आवक वाढेल त्यादृष्टीने येणाऱ्या काळात पूर्वेकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल.

कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वरअंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी २५,२९३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या उपलब्ध ८४.७७ टीएमसी, तर उपयुक्त ७९.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस कोयना २,७९०, नवजा ३,३६२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच २४ तासांत धरणात १.७९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ २०.४८ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरण ८०.५४ टक्के भरले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट एपीके फाईल डाऊनलोड करणे महागात पडले; मोबाईल हॅक करून बनवडी येथील एकास साडेसात लाखांना गंडा
पुढील बातमी
आम्ही जनतेचा, युवकांचा आवाज उठवणार आहोत - अभिजीत दिपके; कोणताही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही

संबंधित बातम्या