सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उद्या रविवार (ता. 24) ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते तसेच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील व खासदार नितीन काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माणचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी दिली आहे.
रविवारी (ता. 24) दुपारी दोन वाजता दहिवडी बाजार पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनिल भाऊ देसाई व त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने माण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीनिवास शिंदे यांनी केले आहे.